आईचे पत्र
- Shoumika Mahadik
- Feb 9, 2021
- 1 min read
प्रिय शांभवी,
भोवतालच जग सुंदर आहेच पण या सुंदर जगात काही वाईट गोष्टीही आहेत. यामधील तू चांगल्या गोष्टींची निवड कर. आणि एखादी गोष्ट तुला पटत नसेल तर खरंच... आता बस्स झालं! हे समजण्याइतकी, म्हणण्याइतकी तू खंबीर हो. स्वतःची ठाम भूमिका घ्यायला, निडरपणे बोलायला शिक. तुला दुखावण्याचा अधिकार इतरांना देऊ नको. आयुष्यात अनेक लोक येतील, चांगले आणि वाईट दोन्हीही. चांगली लोकं तुला मार्गदर्शन करतील, तुझं कौतुक करतील. त्यांना आदर द्यायला, त्यांची ऋणी राहायला शिक. त्याचवेळी तुला मागे खेचू पाहणारेही भेटतील. कारण नसताना केवळ स्त्री म्हणून तुला हीन दर्जा देऊ पाहतील. पण त्यांच्यासाठी कधी स्वतःला बदलू नको. तुझ्या कोवळ्या मनात त्यांना तिरस्काराचीही जागा देऊ नको. स्वतःच्या तेजाने लोकांना भुरळ घाल. ज्यांना जायचं असेल ते जातील, उणीव असेल तर त्यांच्यात आहे.. फक्त त्यासाठी म्हणून कधी तू तुझा प्रवाह बदलू नको.

आयुष्य चढउतारांनी भरलंय. ज्या कडून जे शिकता येईल ते शिक, जिथून जे टिपता येईल ते टिप आणि तुझ्यातील दिव्य स्त्रीत्वाला भरभरून जग.
कन्यादिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा !
Comments